Hyundai Cars : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्यस्तरीय, विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने वितरित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे एकूण ४६ गाड्या १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत खरेदी करण्यात आल्या आहेत. ह्युंदाई (Hyundai) कंपनीच्या वाहनांचे वितरण राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते कौन्सिल हॉल पुणे येथे करण्यात आले.
जनतेला आरोग्य सुविधा तातडीने पुरविण्यासाठी होणार फायदा
आरोग्य विभागातील अनेक अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात कामकाजासाठी फिरण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत ४६ वाहने खरेदी करण्यात आली असून त्यांचे वितरण राज्यातील सर्व भागातील अधिकाऱ्यांना झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाला निश्चित गती मिळणार आहे. यावेळी विभागीय उपायुक्त वर्षा ऊंटवाल-लड्डा, रामचंद्र शिंदे, उपसंचालक कैलास कराळे, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे ह्युंदाई मोटर्स कंपनीचे उच्च अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यात ह्युंदाई (Hyundai) कंपनीला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी मा. मंत्री महोदय व आरोग्य विभागाचे आभार मानले.
आयुक्त, आरोग्य सेवा अंतर्गत राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षकीय कामकाज सुरळीत पार पाडता यावे यासाठी वाहन खरेदीकरिता खर्चास शासनाने मंजुरी दिली होती. राज्यातील ५ उपसंचालक, ११ सहायक संचालक, १४ जिल्हा आरोग्य अधिकारी व १६ जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाला ही वाहने हस्तांतरीत करण्यात आली आहेत.
हे ही वाचा : अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू - सरकारी नोकरी महा भरती जाहिराती येथे पहा - बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन शासन निर्णय