Government Employees News: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ देण्यासंदर्भात शासनाने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे, असे शासकीय कर्मचारी जे दि. 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, आता राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत महत्वाचा निर्णय शासनाने घेतला असून, तसा शासन आदेश 26 सप्टेंबर 2023 रोजी जारी करण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
राज्यातील या कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील पदवीधर वेतनश्रेणीतील पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावरुन, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळल्यानंतर, काही जिल्हा परिषदा वेतन निश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१, नियम ११ (१) (अ) नुसार पदोन्नतीची एक काल्पनिक वेतनवाढ देत नसल्याचे, महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ व काही माननीय विधानसभा/विधान परिषद यांच्या पत्रान्वये शासनाच्या निदर्शनास आल्याने याबाबत,आता सर्व समावेशक सुचना देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पदवीधर प्राथमिक शिक्षक संवर्गातून सेवाज्येष्ठता, गुणवत्ता व सामाजिक आरक्षण या निकषांवर पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापकांना ग्राम विकास विभागाच्या दिनांक 18 नोव्हेंबर, 1988 च्या शासन निर्णयानुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हे पदनाम निश्चित करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय 14 नोव्हेंबर, 1994 अन्वये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी केंद्रप्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 मधील नियम 11 (1) नुसार तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा किंवा जबाबदाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाची कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या येत असतील आणि वर्ग दोनच्या पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद ते धारण करित असेल तर, त्याचे वरच्या पदाच्या समयश्रेणीतील प्रारंभिक वेतन हे, खालच्या पदाच्या ज्या टप्याला त्याचे वेतन असेल त्या टप्याला एक वेतनवाढ मिळवल्यानंतर, आणि वेतनमानातील कमाल वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत मागील वेतनवाढीइतकी रक्कम मिळाल्यावर, जे मानीव वेतन येईल त्याच्या पुढील टप्यावर निश्चित करण्यात येईल.
हे ही वाचा - अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू - कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू
या तरतुदीनुसार एक वेतनवाढ देवून त्यांची वेतन निश्चिती करण्याबाबत 26 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार कळविण्यात आले आहे.