Mukhyamantri Swachh Mumbai WhatsApp Helpline Launched : नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन'चा (८१६९६८१६९७) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ व कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महानगरपालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.
अशी आहे 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' सुविधा
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाइन' कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रिज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.
घनकचरा व डेब्रिज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ॲप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.