Maharashtra School News : भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील जवळपास 60 ते 70 टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. एकीकडे 21 व्या शतकात प्रत्येक पालक आणि विद्यार्थी शेती व्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात करियर करण्याचे मार्ग शोधत आहेत. त्यावर आता सरकारने शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात (Agriculture Education) कृषी विषयाचा समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव कृषी विभागाने शालेय शिक्षण विभागाला दिला आहे.
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. यासंदर्भातील अहवाल मंत्री श्री. सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळणार - Agriculture Education
यावेळी कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्त्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते ८ वी आणि ९ वी ते १० वी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते उपलब्ध करुन देण्याची तयारी कृषी विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्त्व, उपयोजना, व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव अशा अनेक पैलूंकडे लक्ष केंद्रित करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री श्री. सत्तार यांनी व्यक्त केला.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद (SCERT) आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा. अभ्यासक्रमाची रचना करताना विद्यार्थ्यांना संबंधित विषयाबद्दल रुची निर्माण होईल, या पद्धतीने असावी.
यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव , शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव, सहसचिव (कृषि), कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक, कृषी संचालक (शिक्षण), संचालक (संशोधन), अवर सचिव आदींची यावेळी उपस्थिती होती.
नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.