मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत टाकावे? इंग्रजी माध्यम,सेमी की, मराठी?

असाध्य ते साध्य करीता सयास ! कारण अभ्यास तुका म्हणे!! प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सुशिक्षित परिवार सु:खी परिवार. असे आपण बरेचदा ऐकतो, वाचतो. प्रत्येक पालक आपल्या मुलांना लहान वयापासून त्यांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देऊन चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. सर्वच पालकांना पडणारा सामान्य प्रश्न म्हणजे मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत टाकावे? म्हणजे मुलांना इंग्रजी माध्यमाची शाळा योग्य राहील? की सेमी इंग्रजी किंवा मराठी माध्यमाची शाळा योग्य राहील. हा गोंधळून टाकणारा प्रश्न पालकांसमोर असतो. आज आपण मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत टाकावे? याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. तेव्हा आपल्याला देखील हा प्रश्न पडला असेल आणि आपण मुलांसाठी कोणती शाळा निवडावी? अशी संभ्रम अवस्था असेल तर हे आर्टिकल अवश्य वाचावे. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया

{tocify} $title={ठळक मुद्दे}

मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत टाकावे? 

शिक्षणाचे माध्यम

जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर जेव्हा रोपटं होऊन त्याला योग्य वेळी योग्य खत-पाणी दिल्यावर त्याचं मोठ्या झाडामध्ये रूपांतर होतं आणि मग ते काही वर्षांनी आपल्या फळ देतं. 

मुलांचं देखील अगदी तसच आहे. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याला योग्य वेळी योग्य वातावरणात खत-पाणी दिले तर मोठे झाल्यावर ते आपल्या शिक्षणाचा उपयोग पुढील आयुष्यात करते. योग्य खत-पाणी म्हणजे योग्य संस्कार आणि शिक्षण मिळाले, तर ते स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरी, व्यवसाय करून त्यातून त्याला त्याचे फळ मिळत असते. 

लहान असताना पालक म्हणून आपली खूप महत्त्वाची जबाबदारी असते. ती म्हणजे योग्य संस्कार आणि शिक्षण देणं त्यासाठी सर्वच पालकांना पडलेला प्रश्न म्हणजे मुलांना शिक्षणाचे माध्यम कोणते निवडावे? आजकाल वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा प्रत्येक शहरात/ ग्रामीण भागात देखील उपलब्ध झालेल्या आहेत.

परंपरागत चालत आलेली शिक्षण पद्धती दिवसेंदिवस होणारे बदल/शिक्षणातील आव्हाने लक्षात बदल होताना दिसून येते. नुकतेच "नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020" जाहीर झालेले आहे. या शैक्षणिक धोरणाचा विचार करता मुलांच्या कौशल्य आधारित शिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला दिसून येत आहे. अशा वेळी या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांसाठी शिक्षणाचे योग्य माध्यम निवडणे हे प्रत्येक पालकांसाठी आव्हानात्मक झाले आहे. 

सध्या असा एक ट्रेंड झालेला आहे की, इंग्रजी माध्यमातून मुलांना शिक्षण दिले म्हणजे ते भविष्यात यशस्वी होणार त्याला लवकर पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध होणार, मात्र हा गैरसमज प्रथमतः काढून टाकायला हवा. पूर्वी मराठी, हिंदी व इतर लोकल भाषेत काही अभ्यासक्रम उपलब्ध नव्हते. मात्र आता प्रत्येक भाषेत अभ्यासक्रम उपलब्ध झालेले आहे.

सध्या सर्वांत लोकप्रिय शिक्षणाच्या माध्यमाचे पर्याय म्हणजे इंग्रजी माध्यम ,सेमी इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यम त्याही पुढे म्हणजे आपली मातृभाषा जसे की, मराठी, हिंदी,उर्दू इ. 

मुलांचे शिक्षण कोणत्या माध्यमातून असावे? मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी कोणत्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे. यासाठी शाळेची निवड करत असताना सर्वात आधी आपण शिक्षण तज्ञांनी केलेले संशोधन आणि त्यातून काढलेले निष्कर्ष हे समजून घेऊया जे की, आपणास मुलांच्या शिक्षणासाठी कोणते माध्यम निवडले पाहिजे? यासाठी मदत होईल.

>>  मुलांमधील अतिचंचलता लक्षणे व गुणकारी उपाययोजना

>> स्वत:मधील क्षमतांचा शोध कसा घ्यावा? | करिअर कसे निवडायचे ? | स्व ची ओळख

मुलांचा बौद्धिक विकास कोणत्या भाषेतून चांगल्या प्रकारे होतो? शिक्षणतज्ञांनी मांडलेले मत

⇨ मुलांचा बौद्धिक विकास हा मातृभाषेतून चांगल्या प्रकारे आणि झटपट होतो.

⇨  लहान वयात मुले घरातील लोकांचे आवाज ऐकूनच शिकत असते. त्यामुळे जी भाषा घरात बोलली जाते. त्याच भाषेत मुले विचार करू लागतात. त्यामुळे विचार प्रक्रियेला चालना मिळते. याउलट इंग्रजी भाषेत विचार करण्यास मुलांना अडथळा निर्माण होऊ शकतो.

⇨ मुलांच्या घरातील बोली भाषेतच मुले विचार करतात आणि प्रश्न विचारतात. म्हणजेच मुलांना ज्ञान प्राप्त होते.मुले जेवढे जास्त प्रश्न विचारतील तेवढे ते शिकत जातात. आणि त्यांच्या संकल्पना दूर होतात.

⇨  शिक्षकांनी किंवा आपण मुलांना मातृभाषेतून एखादा प्रश्न विचारला तर त्याचे चटकन आकलन होते.

⇨  शाळेतील , घरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील बोलीभाषा जी असेल, त्या भाषेतून शिक्षण हे मुलांसाठी सहज-सोपे, आकलन नीट होणारे व आनंददायी असते. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळते.

थोडक्यात काय तर जी मुलाची मातृभाषा असेल, मराठी,हिंदी, इंग्रजी किंवा उर्दू त्या भाषेतूनच लहान वयात मुलांचा भाषिक व बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होतो. 

मुलांच्या भाषेसंदर्भात आईची भाषा ही मुलाची भाषा असते. लहान मूल जेव्हा नर्सरी किंवा ज्युनिअर,सिनियर केजी मध्ये जाते त्या वयात त्याचा भाषा विकास हा सुरू असतो. म्हणजे जर घरातील भाषा मराठी असेल आणि शाळेतील इंग्रजी तर मग अशावेळी त्या बाळाचा भाषा विकास हा खुंटतो. म्हणजे घरी आल्यावर मराठीत आणि शाळेत गेल्यावर इंग्रजी यामध्ये ते लहान मूल कन्फ्युज होते. गोंधळून जाते. म्हणजे एका अर्थाने 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी मुलांची अवस्था होते. 

मुलांच्या शिक्षणाचे माध्यम निवड करत असताना येथे आपण कोणती भाषा श्रेष्ठ आणि कोणती कनिष्ठ याची तुलना अजिबात करत नाही आहोत. तर मुलांना कोणत्या भाषेत जास्त आकलन होईल? प्रश्न विचारता येईल? विचार करता येईल त्या भाषेबद्दल आपण याठिकाणी चर्चा करीत आहोत. 

माझ्याच घरातील एक उदाहरण देतो. माझ्या काकाचे दोन्ही मुलांचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून म्हणजेच मराठी माध्यमाच्या शाळेतून झाले. आणि इयत्ता ५ वी पासूनचे पुढील शिक्षण हे सेमी इंग्रजी माध्यमातून झाले आणि आज एक मुलगा एम बी बी एस च्या द्वितीय वर्षाला आहे. आणि एक मुलगा आय आय टी ची तयारी करत आहे. आणि त्याच्याच सोबतचे काही मित्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकून देखील आज डिप्लोमा कोर्सेस करीत आहे. म्हणजे मग इथे माध्यमाचा कोठे प्रश्न आला? त्यामुळे फक्त इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण झाले म्हणजे डॉक्टर , इंजिनियर होता येते. हे सर्वात आधी डोक्यातून काढून टाकावे? 

मुलांना इंग्रजी शिकवायचे आहे? की, इंग्रजीतून शिक्षण द्यायचे आहे? याचा प्रथमत: शोध घ्या? आपली इथेच गल्लत होते. इंग्रजी शिकण्यासाठी आपण इंग्रजी माध्यम निवडतो. यामुळेच तर आता शासनाने प्रत्येक इंग्लिश मेडियम शाळेमध्ये मातृभाषा हा विषय कंपल्सरी केलाय? अशी वेळ का आली असेल? कारण मुलांची मातृभाषा एक आणि शिक्षणाची दुसरीच त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मातृभाषा ही किती महत्वाची आहे? हेच शासनाच्या या स्वागतार्ह निर्णयामागे आपल्याला दिसून येईल.

इंग्रजी माध्यम/मराठी मध्यम की सेमी इंग्रजी माध्यम ?


याबाबतचे विविध मत मतांतरे असू शकतील पण मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या माध्यमाची शाळा योग्य राहील? याचा शोध घेत असताना खालील काही प्रश्न आपण स्वत:ला विचारूया
  • इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांचा अभ्यास आपल्याला घरी घेतायेईल का?
  • मुलांना जर काही अभ्यासात अडचण येत असेल तर आपण मुलांना इंग्रजीतील अभ्यास शिकवू शकतो का?
  • पालक म्हणून आपण मुलांची अभ्यासातील प्रगती तपासू शकू का?
  • मुले शाळेतून घरी आल्यानंतर आपण मुलांशी काही दैनंदिन वाक्य (संभाषण) इंग्रजी मध्ये करू शकू का?
हे प्रश्न का निर्माण झाले असतील याचे उत्तर आपणास मिळाले असेल , कारण की, मुलांना शाळेत टाकले म्हणजे आता आपले काम संपले असे नाही. तर आता खरे काम आपले देखील सुरु होते. शाळेत नक्की काय शिकवले जाते? कसे शिकवले जाते? मुलांना येणाऱ्या अभ्यासातील अडचणी-समस्या पालक म्हणून आपण मुलांचा घरी करून घेणारा अभ्यास यासाठी आपल्यालाही काही मर्यादा येऊ शकतात. त्यासाठी ह्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल.

मुलांसाठी किमान प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळाले पाहिजे असे माझे मत आहे. त्यांनतर पुढे आपण सेमी इंग्रजी किंवा इंग्लिश मेडियम निवड करू शकता. किंवा त्यातही पूर्णतः लहान नर्सरी पासून इंग्लिश मेडियम न ठेवता किमान सेमी पासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही, असे मला वाटते.  त्याचे कारण असे की., सेमी इंग्लिश मुळे मराठी मुलांचे संभाषण चांगले होऊ शकेल त्यांच्या विचार प्रक्रियेला देखील चालना मिळेल. आणि आपणही थोडाफार अभ्यास मुलांचा पडताळून पाहू शकू. पण १००% इंग्लिश मेडियम मध्ये काही मर्यादा नक्कीच येऊ शकतील. ते आपल्या परीस्थितीनुसार योग्य निर्णय घेता येईल.

मातृभाषेतून शिक्षण घेऊन मग भविष्यात माझ्या मुलाला इंग्रजी येणार कंस? स्पर्धेच्या युगात इंग्रजी हे खूप महत्वाचे झाले आहे? 


बरोबर आहे. या स्पर्धेच्या युगात टिकाव ठेवण्यासाठी इंग्रजी देखील यायला हव. प्रत्येक शाळेत अगदी नर्सरी प्ले ग्रुप पासून इंग्रजी शिकविले जाते. पुढे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर आपण मुलांना सेमी इंग्रजी किंवा इंग्लिश मेडियम मध्ये शिफ्ट करू शकतो. त्यातही मला तरी सेमी इंग्लिश हेच शिक्षणाचे माध्यम निवडलेले योग्य राहील असे वाटते. कारण की, मुलांना विज्ञान आणि गणित हा विषय इंग्लिश मधून तर इतर विषय मातृभाषेतून शिकण्यास मिळेल आणि मुलांची चांगली तयारी होईल जे की, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी याची मदत होईल. 



महत्वाच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now