भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने अनेक राष्ट्रभक्त, देशभक्तांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यलढा दिला, यामध्ये त्यांनी देशासाठी बलिदान दिले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिटिशाविरुद्ध उठाव झाले. त्यामध्ये अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने तर काहींनी क्रांती च्या माध्यमातून इंग्रजांना सळो की, पळो करून सोडले. स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 23 जानेवारी रोजी जयंती त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती, त्यांनी केलेले कार्य, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
{tocify} $title={ठळक मुद्दे}
नेताजी सुभाष चंद्र बोस संपूर्ण माहिती मराठी | Subhash Chandra Bose Information in Marathi
Subhash Chandra Bose Information |
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा परिचय
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी झाला. सुभाष चंद्र बोस यांचे पूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस असे आहे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी ते एक होते. सुभाषचंद्र बोस हे आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण झाले होते. महात्मा गांधींनी इंग्रजी सत्तेच्या विरोधात सुरू केलेल्या असहकाराच्या चळवळीतील एक कार्यक्रम सरकारी नोकरीचा त्याग करणे हा होता. गांधीजींच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन सुभाषचंद्र बोस यांनी २२ एप्रिल १९२१ रोजी आय. सी. एस. अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत असलेल्या अत्यंत मानाच्या पदाचा त्याग करून स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला.
काँग्रेसच्या कार्यात सहभाग
सुभाषचंद्र बोस यांच्यावर क्रांतिकारक विचारांचा प्रभाव होता. काँग्रेसच्या तरुण नेत्यांमध्ये त्यांना अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करावी, असा त्यांनी प्रथम पासूनच आग्रह धरला होता. काँग्रेसने १९२९ च्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत केला. हा ठराव संमत होण्यास सुभाषचंद्र बोस यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरले होते.
सुभाषचंद्र बोस चित्तरंजन दासबाबूंचे कट्टर समर्थक व पाठीराखे होते. देशबंधू चित्तरंजन दास कोलकात्याचे पहिले महापौर म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी कोलकात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुभाषबाबूंची नियुक्ती केली. सुभाषचंद्र बोस कोलकात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतानाच क्रांतिकारकांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून इंग्रज सरकारने त्यांना अटक केली होती आणि त्यांची मंडालेच्या तुरुंगात रवानगी केली होती.
महात्मा गांधीजीशी मतभेद
सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांचे अनेक बाबतींत मतभेद होते. इ. स. १९३७ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने सत्तेत सहभागी होऊ नये, असे नेताजींचे मत होते. गांधीजींच्या तडजोडवादी धोरणांना नेताजींनी अनेक वेळा उघडपणे विरोध केला होता. काँग्रेसमधील तरुण वर्गाचा नेताजींना पाठिंबा लाभला होता.
लागोपाठ दुसऱ्या 'वर्षी काँग्रेसचे अध्यक्षपद
इ. स. १९३८ मध्ये सुभाषचंद्र बोस हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्या वेळेपासून त्यांच्यातील व काँग्रेसच्या इतर नेत्यांतील मतभेद अधिकच वाढत गेले. इ. स. १९३९ च्या त्रिपुरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली. त्यांच्याविरुद्ध महात्मा गांधींच्या पाठिंब्यावर पट्टाभिसीतारामय्या हे उभे होते. तथापि, गांधीजींचा विरोध असतानादेखील सुभाषचंद्र बोस अध्यक्ष म्हणून निवडून आले.
'फॉरवर्ड ब्लॉक'ची स्थापना
या वेळी दुर्दैवाने काँग्रेसच्या कार्यकारिणीने नेताजींशी असहकार पुकारला. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि 'फॉरवर्ड ब्लॉक' हा स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला.
नजरकैदेत
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेसने सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू करावे, असा आग्रह सुभाषचंद्रांनी धरला. त्यांच्या या भूमिकेमुळे इंग्रज सरकारने त्यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली अटक केली. पुढे त्यांची सुटका झाली; परंतु त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले.
जर्मनीला प्रयाण
नेताजींनी १९४१ मध्ये या नजरकैदेतून अत्यंत शिताफीने व विस्मय- कारकरीत्या स्वतःची सुटका करून घेतली आणि गुप्तपणे अफगाणिस्तानमार्गे ते जर्मनीस पोहोचले. तेथे बर्लिन नभोवाणीवरून भारतीय जनतेला उद्देशून त्यांनी भाषणे केली आणि ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले. जर्मनीमध्ये त्यांनी 'इंडियन इंडिपेन्डन्स लीग' या नावाची संघटनाही स्थापन केली.
जर्मनीहून जपानला
जर्मनीमध्ये राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी काही भरीव कृती करता येणार नाही असे दिसताच सुभाषचंद्र बोस तेथून जपानला गेले. या वेळी रासबिहारी बोस यांनी जपानच्या हाती सापडलेल्या भारतीय युद्धकैद्यांच्या मदतीने 'आझाद हिंद ने 'ची स्थापना केली होती. आझाद हिंद सेनेचे दुसरे अधिवेशन १९४२ मध्ये बँक येथे भरले. या अधिवेशनासाठी नेताजींना निमंत्रण देण्यात आले.
आझाद हिंद सेनेचे सरसेनापती
नेताजी आझाद हिंद सेनेच्या १९४२ मधील म्हणजे दुसऱ्या अधिवेशना उपस्थित राहिले. तेथे रासबिहारी बोस यांनी नेताजींना आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. रासबिहारीजींची ही विनंती नेताजींनी मान्य केली. अशा रीतीने सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे सरसेनापती बनले.
सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वामुळे आझाद हिंद सेनेत नवचैतन्य संचारले. त्यांनी या सेनेची अनेक पथके उभारून त्यांना गांधी पथक, नेहरू पथक अशी नावे दिली. त्यांनी 'झाशी राणी' या नावाने स्त्रियांचेही एक पथक उभारले आणि त्याचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन (कॅप्टन लक्ष्मी सहगल) यांच्याकडे सोपविले.
तिरंगी ध्वज हे आझाद हिंद सेनेचे निशाण होते. जयहिंद' हे अभिवादनाचे शब्द) "चलो दिल्ली' हे घोषवाक्य, तर 'कदम कदम बढ़ाए जा' हे समरगीत होते. सुभाष चंद्र बोस यांनी 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा' असा नारा त्यांनी भारतीयांना दिला.
हिंदुस्थानचे हंगामी सरकार
सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ मध्ये हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले. या सरकारला जर्मनी, जपान, इटली इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली. नेताजींनी आझाद हिंद सेनेला युद्धसज्ज बनविले आणि मातृभूमीच्या मुक्ततेसाठी 'चलो दिल्ली' असा आदेश दिला. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा।” अशी हाक त्यांनी आपल्या सैनिकांना दिली.
इंफाळपर्यंत धडक
देशभक्तीने प्रेरित झालेल्या आझाद हिंद सेनेतील सैनिकांनी मातृभूमीच्या दिशेने आगेकूच चालविली. मेजर जनरल शाहनवाजखान, कॅप्टन सहगल, कर्नल धिल्लाँ, मेजर जगन्नाथराव भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने नेत्रदीपक विजय मिळवून हिंदुस्थानच्या सीमेपर्यंत धडक मारली. हिंदुस्थानातील माऊडॉक, कोहिमा इत्यादी ठाणी जिंकून ही सेना इंफाळपर्यंत येऊन पोहोचली. दुर्दैवाने तिला इंफाळ जिंकता आले नाही.
विमान अपघातात अंत
याच वेळी महायुद्धाचे पारडे फिरून जर्मनी, जपान यांची पीछेहाट होऊ लागली. त्याबरोबर आझाद हिंद सेनेलाही माघार घेणे भाग पडले. जपान सरकारच्या निवेदनानुसार सुभाषचंद्र बोस विमानाने टोकियोला निघाले असताना त्या विमानाला फोर्मोसा म्हणजेच ताइहोकू बेटावरील विमानतळावर अपघात होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला- १८ ऑगस्ट, १९४५.
असामान्य कार्य
आझाद हिंद सेनेच्या मदतीने ब्रिटिशांचा पराभव करून आपली मातृभूमी परदास्यातून मुक्त करण्याचे नेताजींचे स्वप्न साकार झाले नाही; परंतु, त्यांच्या कार्याने असंख्य भारतीयांची मने राष्ट्रभक्तीने पेटून उठली आणि त्यांना देशसेवेची नवी प्रेरणा मिळाली. आपल्या बलिदानातूनही राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी असीम त्याग करण्याचा संदेश त्यांनी आपल्या देशबांधवांना दिला. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात नेताजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.