प्रबळ इच्छाशक्तिचा अजिंक्य सम्राट म्हणून ओळखले जाणारे - स्टिफन हॉकिंग यांच्याविषयी
स्टीफन हॉकिंग माहिती - Stephen Hawking Information Marathi
1962 साली हिवाळी सुट्ट्या लागल्या. ऑक्सफर्ड विद्यापिठातील सर्व विद्यार्थी घरी निघाले. त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड मधील सर्वात बुद्धिमान विद्यार्थ्याला सुद्धा घरी जाण्याची ओढ लागली. घरी गेल्यावर खूप खूप मस्ती करायची व अभ्यासाला सुट्टी द्यायची, असे सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे तोही विचार करत होता. तो घरी पोहचला. घरातील सर्व सदस्य त्याची वाट पाहत होते. घरी त्याच्या आवडीचे पदार्थ करण्यात आले. थोड्याच दिवसांनी त्याचा एकविसवा वाढदिवस येणार होता. त्या दृष्टिने त्याने आपल्या वाढदिवसाची इच्छा व्यक्त केली. वडीलांनीही त्याला होकार दिला.
एक दिवस पायऱ्यावरून उतरत असतांना अचानक चक्कर आली व तो खाली पडला. सुरुवातीला अशक्तपणामुळे झाले असावे असे वाटणाऱ्या गोष्टी सतत घडत असल्यामुळे त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी सांगितले याला खूपच दुर्धर असा 'मोटार न्यूरॉन डिसीज' नावाचा आजार झाला आहे. हा आजार कधीच बरा होऊ शकणार नाही व हा दोन वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही. त्या विद्यार्थ्याचे नाव होते 'स्टिफन विलियम हॉकिंग'.
पाहिलेली स्वप्न क्षणात चिरडली गेली. त्याला असे वाटत होते आता सर्वकाही संपले. कारण या आजाराने स्टिफनचे हळूहळू सर्व अवयव निकामी होणार होते. त्याने जगण्याची आशा सोडली, आपण हरलो, आजपर्यंत घेतलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले. 'जेव्हा माणसावर मोठे संकट येते तेव्हा त्याचे जीवन संपले असे वाटते पण ती खरी जीवनाची सुरुवात असते'.
हॉस्पिटल मध्ये शेजारच्या एका रोग्याला एका असाध्य आजाराशी संघर्ष करतांना पाहिले व त्याला आशेचे किरण दिसू लागले. या घटनेने प्रेरीत होऊन तो डॉक्टर व नातेवाईकांना म्हणाला," 2 वर्षे नाही मी 50 वर्षापेक्षाही जास्त जगणार आहे." स्टिफनने जे बोलले ते सत्यात उतरविले. मृत्यूशी झुंज दिली व त्यावर मात केली एवढेच नाही तर वैज्ञानिक क्षेत्रात अमूल्य योगदानही दिले.
एक विश्वविख्यात भौतिकशास्त्रज्ञ, अंतराळ वैज्ञानिक, गणिताचे प्राध्यापक अशी ओळख असणाऱ्या स्टिफन हॉकिंग यांचा जन्म 'गॅलिलीओ गॅलीली' यांच्या मृत्यूनंतर 300 वर्षांनी म्हणजेच 8 जानेवारी 1942 साली झाला.
बालपणापासून स्टिफन एकपाठी होते. अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त असणाऱ्या स्टिफनमध्ये बालपणापासूनच शास्त्रज्ञांचे गुण दिसून येत होते. प्रत्येक वस्तूची निर्मिती व कार्यप्रणाली जाणून घेण्याचा तो सतत प्रयत्न करत असे, त्यामुळे त्याला शाळेत सर्वजण 'आईनस्टाईन' म्हणत असत.
स्टिफनचे वडील त्याला स्वतःप्रमाणे डॉक्टर बनवू इच्छित होते. परंतु त्याला गणिताची आवड होती. त्यावेळी पुढील शिक्षणासाठी गणित विषय नसल्याने त्याने भौतिकशास्त्र घेऊन पुढील शिक्षण चालू ठेवले.
पुढे आपल्या आवडत्या गणित विषयाला अनुसरून 'विश्वउत्पत्तीशास्त्र' (Cosmology) या विषयाची निवड करून उच्च शिक्षण सुरू केले. त्यानंतर त्याने ऑक्सफर्ड विद्यापिठाची परीक्षा पास करून Phd साठी संशोधन सुरू केले.
मोटार न्यूरॉन डिसीज हा असा आजार आहे की त्यामुळे शरीरातील नसांवर सतत हल्ला होऊन हळूहळू रोग्याचे सर्व अवयव काम करणे बंद करतात व रोगी शारीरिकरित्या असमर्थ होतो. शेवटी श्वसनलिका बंद होऊन माणूस गुदमरून मरतो, याची स्टिफनला जाणीव होती.
जगण्याची इच्छा निर्माण झाली परंतु हे समजत नव्हते की उर्वरीत आयुष्य कसे व कोणत्या उद्देशासाठी जगायचे ? आयुष्यात येणाऱ्या अडचणी कश्या सोडवायच्या ? आपल्याला कोण साथ देईल ? असे अनेक प्रश्न मनात गोंधळ घालत होते. त्याने शांतपणे डोळे मिटले व मनाशी ठाम निश्चय केला.
यापुढे येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड द्यायचे. आपण हिंमत सोडायची नाही. हळूहळू आपले अवयव आपली साथ सोडत जातील. त्याबद्दल दुखः वाटून न घेता जे अवयव आपल्याला साथ देतील त्यांचा पुरेपूर वापर करून आपले उर्वरीत आयुष्य आनंदाने जगायचे. जी आपली कमतरता आहे तीलाच सर्वात मोठी ताकद बनवू याच इच्छाशक्तिच्या जोरावर स्टिफन यांना न्यूटन व आईनस्टाईनच्या बरोबरीचे शास्त्रज्ञ म्हणून गणले जातात.
वयाच्या एकविसाव्या वर्षी स्टिफन यांना अर्धांगवायू झाला व त्यांच्या शरीराच्या उजव्या भागाने काम करणे बंद केले, ते काठीच्या आधारे चालत असत. याच काळात त्यांनी Phd चा अभ्यासक्रम पूर्ण केला व जेन वाइल्ड यांच्याशी विवाह केला. यानंतर स्टिफन यांनी आपल्या शास्त्रज्ञ जीवनाची सुरुवात केली. म्हणजे जेथे स्टिफन यांचे आयुष्य संपले असे वाटत होते तेथून त्यांनी खरे आयुष्य जगण्यास सुरुवात केली व हळूहळू त्यांच्या बुद्धिमत्तेची ख्याती जगभर पसरली.
स्टिफन यांच्या शरीराच्या डाव्या भागानेही काम करणे पूर्णपणे बंद केले. परंतु त्यांनी या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केले व आपल्या वैज्ञानिक संशोधनावर लक्ष केंद्रित केले. आजार एवढा वाढला की त्या आजाराने त्यांना चाकाच्या खुर्चीवर (Wheelchair) बसविले. खुर्चीने त्यांच्या शरीराला बंदीवान केले पण त्यांच्या विचारांना, त्यांच्या बुद्धिमत्तेला व प्रबळ इच्छाशक्तिला ना खुर्ची बंदिस्त करू शकली ना त्यांचा आजार.
स्टिफन यांनी त्यांची व्हिलचेअर अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज करून घेतली व आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. प्रत्येकवेळी स्टिफनचा एक एक अवयव निकामी होत होता व तो त्यावर मात करून अधिक उत्साहाने कार्य करत होता.
स्टिफनचा बुद्ध्यांक (IQ) 160 च्या जवळपास आहे. त्यांनी कृष्णविवराची संकल्पना स्पष्ट केली व हॉकिंग रेडिएशनचा विचार मांडला. व्हिलचेअरवर बसून अंतराळ विज्ञानातील जटील कोडे सोडविले. विश्वउत्पत्तीशास्त्र (Cosmology) व पुंज गुरुत्व (Quantum Gravity) या दोन शाखांमध्ये कृष्णविवराच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. त्यांच्या ' A Brief History Of Time' या पुस्तकाने विज्ञान जगतात विक्रम प्रस्थापित केले.
सन 1985 ला त्यांना न्यूमोनिया झाला. त्यावर श्वसननलिकेला छिद्र पाडून शस्त्रक्रिया केली व स्टिफनचा आवाज कायमचा गेला. स्टिफनने व्हिलचेअरवर अत्याधुनिक संगणक प्रणाली व स्पिच सिंथेसायझर लावून घेतले व ते सिस्टम इंफ्रारेड ब्लिंक स्विच च्या साहाय्याने त्यांच्या चश्म्याला जोडलेली आहे. ज्यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे स्टिफनला शक्य झाले.
स्टिफनकडे 12 मानद पदव्या आहेत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2009 ला अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'प्रेसीडेंशिअल मेडल ऑफ फ्रिडम' ने त्यांना सन्मानित केल्या गेले. 90% विकलांग असून देखील स्टिफन हे एवढ्या कठीण काळात देखील नियमितपणे वाचनासाठी ग्रंथालयात जात होते. स्टीफन हॉकिंग या महान शास्राज्ञानी 14 मार्च 2018 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
स्टीफन हॉकिंग यांचे विचार
"स्टीफन हॉकिंग नेहमी म्हणत होते की माझ्या आजारपणामुळे मी मोठा शास्त्रज्ञ झालो माझ्या अपंगत्वामुळे मला विश्वावर केलेल्या संशोधनाचा विचार करण्याचे काम मिळाले."
"माझ्या अभ्यासाने हे सिद्ध केले की जगात कोणीही अपंग नाही."
"मी मेंदूला एक संगणक समजतो त्याचे वेगवेगळे भाग निकामी झाल्यामुळे काम करणे थांबतो."
"आयुष्य कितीही कठीण वाटत असलं तरी, तुम्ही काहीतरी करू शकता आणि यशस्वी होऊ शकता."
"मी असे लोक पाहिले आहेत जे म्हणतात की सर्वकाही पूर्वनिर्धारित आहे आणि आम्ही ते बदलण्यासाठी काहीही करू शकत नाही, ते रस्ता ओलांडण्यापूर्वी ते पाहतात."
"शहाणपण म्हणजे बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता."
"जर तुम्ही नेहमी रागावत असाल किंवा तक्रार करत असाल तर लोकांकडे तुमच्यासाठी वेळ नसेल"
"भूतकाळ हा भविष्यासारखाच अनिश्चित आहे आणि तो केवळ शक्यतांच्या स्पेक्ट्रमच्या रूपात अस्तित्वात आहे.”
➡️ समाज कल्याण दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना
➡️ अस्थिव्यंग म्हणजे काय? सुविधा व सवलती संपूर्ण माहिती (Locomotor Disability Meaning)
>> तारे जमीन पर : अध्ययन अक्षम (ईशान) ची प्रेरणादायी यशोगाथा