अध्ययन अक्षमता म्हणजे काय? | Learning Disability Meaning In Marathi

तारे जमीन पर हा चित्रपट आपण पाहिला असेल, या चित्रपटामध्ये ईशान अवस्ती या आठ वर्षाच्या मुलाची काल्पनिक कथा दाखवलेली आहे. यामध्ये ईशानला डिस्लेक्सिया या अध्ययन अक्षम विकारामुळे त्याला शिक्षण घेण्यामध्ये समस्या, त्याची वर्तन समस्या दाखवलेली आहे. शिक्षक-पालक व त्याचे मित्र यांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील आपल्याला तारे जमीन पर या चित्रपटात पहायला मिळते. त्यातच निकुंभ सरांनी (अमीर खान) ईशानची समस्या ओळखून त्यानुसार अध्ययन अध्यापनाच्या तंत्र पद्धती वापरून त्याला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तारे जमीन पर या चित्रपटामध्ये दाखवलेली ही समस्या फक्त चित्रपटा पुरती मर्यादित न राहता आपल्या आजूबाजूला, समाजामध्ये असे कित्येक मुलं आहेत की, त्यांच्यामध्ये अध्ययन अक्षमता आपल्याला दिसून येते, मात्र त्याची ओळख नसल्यामुळे त्याचे निदान आपल्याला लवकर करता येत नाही. त्यासाठी आजच्या आर्टिकल मध्ये आपण अध्ययन अक्षम म्हणजे काय? (What Is Learning Disability) अध्ययन अक्षमता दोष का निर्माण होतात? तसेच अध्ययन अक्षमता संदर्भात असणारे गैरसमज व वास्तव कोणते आहे? या बद्दलची संपूर्ण माहिती अध्ययन अक्षम म्हणजे काय? (Learning Disability Meaning In Marathi) या आर्टिकल मध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.


{tocify} $title={अनुक्रमणिका}


अध्ययन अक्षमता म्हणजे काय? | Learning Disability Meaning In Marathi

अध्ययन म्हणजे काय? | Learning Meaning In Marathi

अध्ययन अक्षमता म्हणजे काय? हे समजून घेण्याअगोदर आपण अध्ययन म्हणजे काय? (Learning Meaning) हे समजून घेऊया. त्यानंतर आपण अध्ययन अक्षम म्हणजे काय? (What Is Learning Disability) याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

अध्ययन अक्षमता या शब्दामध्येच अध्ययन अक्षमतेबाबत असणारी समस्या आपल्याला लक्षात येते. सर्वप्रथम आपण अध्ययन म्हणजे काय? ते पाहूया.

प्रत्येक जण जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटापर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अध्ययन करत असतो. अध्ययन हे नैसर्गिकरीत्या घडणारी प्रक्रिया आहे. साधारणपणे अध्ययन हे दोन प्रकारे घडून येते. 

१. सर्वसामान्य अध्ययन आणि २. शास्र शुद्ध पद्धतीने केलेले अध्ययन यालाच आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घडलेले अध्ययन देखील म्हणू शकतो. थोडक्यात काय तर दैनदिन जीवन जगत असताना आपण कुटुंब , शेजारी , आजूबाजूचा परिसर , नातेवाईक यांच्या मध्ये आपण सहभागी होत असतो. तेव्हा ते अनुभव आपण नकळतपणे विचारांची देवाण-घेवाण करतो. हे एक अप्रत्यक्षपणे घडत असलेले अध्ययन होय.

जेव्हा आपण विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून अध्ययन करतो. त्यामध्ये शालेय स्तारवरील शालेय शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी एका विशिष्ट क्षेत्रात करियर करण्यासाठी आपण प्रवेश घेतो. म्हणजे मुलांना जर डॉक्टर व्हायचे असेल तर आपण वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतो. इंजिनियर होण्यासाठी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतो. म्हणजे एक विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर असल्यामुळे विशिष्ट हेतूने घेतलेले शिक्षण हे  शास्र शुद्ध पद्धतीने केलेले अध्ययन (Learning) असते.

आता आपल्याला अध्ययन म्हणजे काय? हे लक्षात आले असेल , अध्ययन म्हणजे ज्ञान ग्रहण करणे , माहिती घेणे , अनुभव घेणे , अनुकरणातून शिकणे हे देखील एक प्रकारचे अध्ययन आहे.

Learning Disability Meaning In Marathi


अध्ययन म्हणजे काय? व्याख्या | Learning Meaning In Marathi


'सराव आणि अनुभव यांच्या द्वारे वर्तनात घडून येणारे सापेक्षत: टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय. ' 'अध्ययन म्हणजे नवीन प्रतिक्रियेचे संपादन आणि जुन्या प्रतिक्रियेचे विस्तारित प्रवर्तन म्हणजे अध्ययन होय.'

अशा प्रकारे प्रत्येकजण अध्ययन करत असतो. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप कसे असते? याबद्दलची माहिती आपण यापूर्वीच घेतली आहे.


अध्ययन अक्षम म्हणजे काय? | Learning Disability Meaning In Marathi

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 (RPWD ACT 2016) नुसार दिव्यांगत्वाचे 21 प्रकार  केलेले आहे त्यामध्ये अध्ययन अक्षमता या प्रकाराचा समावेश आहे त्यालाच Specific Learning Disabilities (स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी) असे संबोधले आहे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार अध्ययन अक्षमतेची (Definition Of Specific Learning Disabilities) व्याख्या पुढीलप्रमाणे 

अध्ययन म्हणजे काय? हे आपण आत्ताच पाहिले, प्रत्येक जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अध्ययन करत असतो. आता अध्ययन अक्षमता म्हणजे काय? (Learning Disability Meaning) हे आपण पाहूयात. ज्याप्रमाणे अध्ययन म्हणजे अनुभव घेणे किंवा शिकणे (शिक्षण घेणे) तर अक्षमता म्हणजे साधारणपणे सोप्या भाषेत सांगायचे तर,  एखाद्या विशिष्ट कौशल्यांमध्ये किंवा विषयांमध्ये अध्ययन करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्याला अक्षमता असे म्हटले जाते. 

म्हणजे एखाद्या गोष्टीचे ज्ञान ग्रहण करण्यामध्ये अडथळा निर्माण होणे. अध्ययन अक्षमता हा शब्द जेव्हा एकत्रितरित्या आपण वाचतो तेव्हा अध्ययन आणि अक्षमता यांचा अर्थ असा होतो की, अध्ययन करण्यात येणारा अडथळा म्हणजे अध्ययन अक्षमता होय. मात्र अध्ययन अक्षमता याची शास्र शुद्ध व्याख्या आपण पुढे पाहणार आहोतच, तत्पूर्वी अध्ययन अक्षमताची संकल्पना काय आहे? ते पाहूया.

अध्ययन अक्षमता हा विविध अक्षमतांचा समूह आहे. यामध्ये भाषा आकलन करणे, भाषा ग्रहण करणे, संभाषण करणे, भाषा चे लेखन करणे, तर्क विचार शक्ती करण्यामध्ये अक्षम असणे किंवा गणितीय क्षमता संपादनातील दोष त्याचबरोबर ऐकणे, विचार करणे, बोलणे, वाचन, लेखन, शुद्ध लेखन, गणित अशा विविध क्षमतांचा अध्ययन अक्षमता मध्ये समावेश असतो. या विविध क्षमता प्राप्त करण्यामध्ये अध्ययन अक्षमता असणारा विद्यार्थी किंवा व्यक्ती त्याला या क्षमता अध्ययन करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यांना अध्ययन क्षमता असे म्हटले जाते.

अध्ययनामध्ये मूलभूत अध्ययन प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर यामध्ये विशेषत: भाषा वापरण्यामध्ये मग ते बोलल्या मध्ये असेल, लिहिण्यामध्ये असेल यामध्ये जे दोष आढळतात त्यांना अध्ययन दोष असे म्हटले जाते.

अध्ययन अक्षमता म्हणजे काय? व्याख्या | Definition Of Specific Learning Disabilities

अध्ययन अक्षमता हा विविध प्रकाराच्या अक्षमतांचा समूह आहे. ज्यामध्ये मुख्यत्वे श्रवण, बोलणे, वाचन-लेखन, तर्क विचार व गणितीय क्षमता या विविध क्षमतांच्या संपादनात व त्याचा वापर करण्यास समस्या असतात. त्यांना अध्ययन अक्षम असे म्हणतात.

जेव्हा अध्ययन अक्षमता असणारी व्यक्ती किंवा विद्यार्थी त्याच्या समवयस्क मुलांप्रमाणे किंवा व्यक्तीप्रमाणे विविध शैक्षणिक प्रकारचे अनुभव देऊनही शैक्षणिक क्षमता संपादन करू शकत नाही. तसेच बोलणे, श्रवण करून आकलन करणे, लेखन करणे, वाचन कौशल्य, वाचनाचे आकलन, गणितीय आकडेमोड, गणितीय तर्क विचारशक्ती या विविध बौद्धिक क्षमतामध्ये त्या व्यक्ती किंवा विद्यार्थ्यामध्ये बदल होत नाही तेव्हा त्या विद्यार्थ्यास अध्ययन अक्षमता असे म्हणता येईल.


अध्ययन अक्षमता मध्ये विशेषतः विशिष्ट वाचन दोष Dyslexia, विशिष्ट लेखन दोष Dysgraphia, विशिष्ट अंकगणितीय दोष Dyscalculia यांचा समावेश होतो. या क्षमता प्राप्त\ करण्यामध्ये जेव्हा दोष निर्माण होतात तेव्हा त्यास अध्ययन अक्षमता म्हणतात.

Definition Of Specific Learning Disabilities

'specific learning disabilities' means a heterogeneous group of conditions wherein there is a deficit in processing language, spoken or written, that may manifest itself as a difficulty to comprehend, speak, read, write, spell, or to do mathematical calculations and includes such conditions as perceptual disabilities, dyslexia, dysgraphia, dyscalculia, dyspraxia and developmental aphasia.{alertSuccess}

अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक हा सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो. अध्ययन दोष हे आंतरिक स्वरूपाचे असतात. ज्यामुळे अध्ययन व त्याचे वर्तन हे प्रभावित होत असतात.

>> दिव्यांग (अपंगत्व) येण्याची कारणे

अध्ययन अक्षमता दोष का निर्माण होतात?

अध्ययन अक्षमता दोष का निर्माण होतात? याचे जर आपण वैद्यकीय भाषेमध्ये स्पष्टीकरण मागितले, तर यामध्ये स्पेशलिस्ट डॉक्टर अधिक चांगल्या प्रकारे वैद्यकीय भाषेतून आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतील. 

मात्र साधारणपणे  अध्ययनाच्या संदर्भात असणारे दोष असतात ते यामुळे निर्माण होतात की जेव्हा केंद्रीय मज्जासंस्थेचे कार्य हे योग्य प्रकारे होत नाही म्हणजेच मेंदूच्या कार्यात समस्या निर्माण होते तेव्हा अशा प्रकारचे दोष निर्माण होत असतात. हे दोष आंतरिक असतात.  

अध्ययन अक्षमता ही मज्जातंतूच्या विकारामुळे येणारी एक प्रकारची अवस्था आहे. ज्याचा परिणाम अध्ययन अक्षम असणाऱ्या व्यक्तीच्या मध्ये माहिती ग्रहण करणे किंवा त्या माहितीवर प्रक्रिया करणे, नवीन माहिती निर्माण करणे अशा विविध क्षमतावर होत असतो.

अध्ययन अक्षमता यांच्या संदर्भामध्ये विविध अध्ययन दोष आपल्याला दिसून येतात. याचा अर्थ असा नाही की, दिव्यांग प्रकारातील इतर प्रकार जसे की बहुविकलांग, बौद्धिक अक्षमता, कर्णबधिरत्व, अंध, सेरेब्रल पाल्सी या प्रकारच्या समस्याचा परिणाम म्हणून उद्भवणार्‍या अध्ययनातील समस्यांना अध्ययन अक्षमता किंवा अध्ययन दोष समजू नये. कारण की अध्ययनातील समस्या या इतर दोषांचा परिणाम म्हणून दिसतात, तर अध्ययन अक्षमता किंवा अध्ययन दोष ही एक अवस्था आहे.

अध्ययन अक्षमता संदर्भात असणारे गैरसमज आणि वास्तव काय आहे?

अध्ययन अक्षमतेबद्दल गैरसमज     वास्तव 
अध्ययन अक्षमता असणारे मुले अजिबात शिकू शकत नाहीत.    अध्ययन अक्षमता असणारी मुले हुशार असतात. अध्ययनाच्या विविध पद्धती वापरून त्यांना शिकविता येते.
अध्ययन अक्षमता मुले आळशी असतात. अध्ययन अक्षमता असणारी मुले ही सर्वसामान्य मुलांप्रमाणेच मेहनती असतात. त्यांना वारंवार मिळणाऱ्या अपयशाने ती खचून जातात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. परिणामी पुन्हा-पुन्हा प्रयत्न करण्याचे टाळतात व इतरांनाही ती आळशी वाटतात.
मुलांच्या वाढत्या वयोमानानुसार अध्ययन अक्षमता नाहीशी होते. अध्ययन अक्षमता नाहीशी होत नाही किंवा पूर्णतः बरी होत नाही. वाढत्या वयाबरोबर मुलांना असणाऱ्या अक्षमता वर दोषावर ते मात करतात. त्या समस्या निराकरणाचे विविध पर्याय शोधतात. त्यामुळे लोकांना अध्ययन क्षमता कमी झाली असे वाटते मात्र प्रत्यक्षात तसे नसते. मात्र समस्या निराकरणाच्या शोधलेल्या पर्यायामुळे आणि सरावाने अध्ययन अक्षमता दोष नाहीश्या होतात.


सारांश

अध्ययन अक्षम म्हणजे विविध अक्षमतांचा समूह होय. जे की, या अध्ययन अक्षम म्हणजे काय? (Learning Disability Meaning In Marathi) या आर्टिकल मध्ये सविस्तर पहिले. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 (RPWD ACT 2016) नुसार अध्ययन अक्षमता म्हणजे काय? व्याख्या , अध्ययन अक्षमते संदर्भात असणारे गैरसमज व वास्तव आणि अध्ययन अक्षमता दोष कशामुळे निर्माण होतात? याबद्दलची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे. यापुढील आर्टिकल हे अध्ययन अक्षमतेचे प्रकार , लक्षणे, उपाययोजना , अध्ययन-अध्यापन तंत्रपद्धती यासंदर्भात असणार आहे. तेव्हा समावेशित शिक्षण या वेबसाईटवरील अपडेट साठी खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉईन करा.


हे सुद्धा वाचा






नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now