कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या किंवा व्यक्तीच्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठीचा हा सप्टेंबर महिना त्यानिमित्ताने सामाजिक न्याय व विशेष विभागाने एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. जागतिक कर्णबधिर जागरूकता सप्ताह दिनांक 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या दरम्यान राबवण्यात येत आहे.
जागतिक कर्णबधिर दिन हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी जागतिक कर्णबधिर दिन हा 25 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येईल. कर्णबधिर व्यक्तींची भाषा म्हणजे सांकेतिक भाषा याद्वारे हे विद्यार्थी संभाषण साधत असतात. त्यालाच साईन लॅंग्वेज किंवा मराठीमध्ये सांकेतिक भाषा असे म्हटले जाते. सांकेतिक भाषा बद्दल जनजागृती निर्माण व्हावी समाजामध्ये सांकेतिक भाषेची माहिती व्हावी या उद्देशाने सांकेतिक भाषा दिन 23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.
समावेशित शाळा आणि सांकेतिक भाषा : समावेशित वर्गातील आनंददायी खेळ
सांकेतिक भाषा ही एक संभाषण साधण्याची कर्णबधिर विद्यार्थ्यांची विशिष्ट भाषा आहे. याद्वारे हे विद्यार्थी संभाषण साधत असतात. परंतु समावेशित शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना सांकेतिक भाषा किंवा साईन लैंग्वेज चा उपयोग केला जात नाही.
याचे कारण असे की सांकेतिक भाषा साईन लँग्वेज शिकावी लागते. ही भाषा अशी असते जसे की, आपण वाचायला लिहायला शिकतो म्हणजे आपण आपली भाषा वाचायला आणि लिहायला शिकतो. अगदी त्याचप्रमाणे सांकेतिक भाषा देखील मुलांना शिकवावी लागते. यामध्ये विशिष्ट स्वर, व्यंजन यांना एक साईन असते.
म्हणजे विशिष्ट अशी खूण असते आणि त्यानंतर या खुणांचा वापर करून छोट्या छोट्या वाक्यामध्ये कर्णबधिर विद्यार्थी किंवा व्यक्ती बोलू लागतात संभाषण साधतात.
मात्र सांकेतिक भाषा शिकल्यानंतर सांकेतिक भाषेमध्ये बोलण्यासाठी संभाषण साधणारे दोन व्यक्ती त्या दोघांना देखील सांकेतिक भाषेचे ज्ञान असायला हवे, तरच दोघांचे सांकेतिक भाषेमध्ये संभाषण होऊ शकते.
समावेशित शिक्षणामध्ये विशिष्ट सांकेतिक भाषा शिकवली जात नाही. कारण सांकेतिक भाषा ही एक संभाषणाचे माध्यम आहे. परंतु समावेशीत शिक्षणामध्ये यासाठी वेगळा पर्याय आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे कर्णबधिर विद्यार्थ्यांकडे असणारे उर्वरित ज्ञानेंद्रिये त्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून त्यांच्याशी संवाद साधला जातो.
कारण सामान्य शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या क्षमता आणि गरजा असणारी विद्यार्थी असतात प्रत्येक मुलाला त्यांच्या कलेनुसार त्यांच्या गतीनुसार अध्ययन-अध्यापन करावे लागते अशावेळी कर्णबधिर मुलांना विशिष्ट सांकेतिक भाषा शिकवणे हे एक आव्हानात्मक आहे.
सर्वसामान्य समावेशित शिक्षणातील मुले ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सांकेतिक भाषा वापरतात. याला विशिष्ट सांकेतिक भाषा असे म्हटले जात नाही.
मात्र तरी देखील हे विद्यार्थी परिस्थितीनुरूप आपल्या सवंगडी किंवा शिक्षकांसोबत सोबत जमेल तसे खाणा-खुना करून बोलत असतात.
समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधिर मुलांना जास्तीत जास्त दृश्य स्वरूपामध्ये अध्ययन अनुभव दिले जातात. कर्णबधिर विद्यार्थ्यांचे डोळे हे चांगले असतात डोळ्यांद्वारे ते ज्ञानग्रहण करत असतात, मग त्यामध्ये चित्र व्हिडिओज, अक्षरे, प्रत्यक्ष पुस्तकातील मजकूर, फळ्यावरील मजकूर, शाळेतील भिंतीवरील चित्र, तक्ते, डिजिटल शाळेतील प्रोजेक्टर, डिजिटल टीव्ही आदि शैक्षणिक साहित्याचा वापर या मुलांना अध्ययन अनुभव देण्यासाठी करण्यात येतो. याच मुलांसाठी नाहीतर हेच साहित्य वर्गातील सर्व मुलांना लागू होते म्हणजे एकाच वेळी एकाच साहित्यातून वर्गातील सर्व प्रकारची मुले शिकू शकतात.
शिक्षक मुलांशी परिस्थितीनुरूप ढोबळ खुणाद्वारे संवाद साधतात. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून अर्थ लावता येतो. कर्णबधिर विद्यार्थी शिक्षकांचे वर्गातील मित्रांचे अनुकरण करून शिकत असतात.
समावेशित वर्गातील आनंददायी खेळ आणि सांकेतिक भाषा
जागतिक कर्णबधिर जागरूकता सप्ताह निमित्त मी एका समावेशित शाळेमध्ये एक प्रयोग केला. तो खालीलप्रमाणे
इयत्ता दुसरी ते पाचवी चे विद्यार्थी एकत्रित घेऊन त्यांना एका वर्गामध्ये बसविले आणि आपल्याला एक खेळ खेळायचा आहे, म्हणून सर्वांना सूचना दिल्या.
त्यामध्ये नंदिनी ही इयत्ता पाचवी मध्ये शिकणारी कर्णबधीर विद्यार्थिनी देखील होती.
मात्र खेळ खेळताना कर्णबधिर विद्यार्थी कडे मी विशेष लक्ष न देता, सर्वांसोबत सर्वांसाठी खेळ आहे असे मुलांना माझ्या बोलण्यातून वागण्यातून जाणवू दिले.
सर्व मुलांना गोल राऊंड मध्ये बसविण्यात आले आणि आता सर्वांना सूचना दिल्या की आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. आणि तो खेळ असा आहे की, आपल्याला गप्पा मारायचे आहेत, आणि मग मुलांना सांगितले की, आता आपली वेळ सुरू झाली.
आणि पुढची पाच मिनिटं आपल्याला काहीही बोलायचं आहे. म्हणजे जसं की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुट्टीच्या वेळेमध्ये किंवा खेळायच्या वेळेमध्ये जे काही बोलता त्या सर्व गप्पागोष्टी आपल्याला करायचे आहेत. आणि आपली वेळ सुरू होते आत्ता. अशा प्रकारे विद्यार्थी आता बोलू लागले. खेळ सुरू झाला.
(इयत्ता दुसरी ते पाचवी चे विद्यार्थी असल्यामुळे मध्ये मध्ये विद्यार्थ्यांना एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी थोडीशी मदत करावी लागली. कारण त्यांना थोडेसे वेगळे वाटत होते की नक्की काय बोलावे यासाठी त्यांना थोडासा सपोर्ट केला छोटे-छोटे प्रश्न एकमेकांना विचारायला सांगितले.)
पाच मिनिटं संपल्यानंतर विद्यार्थ्यांना बोलणे स्टॉप करायला सांगितले विद्यार्थ्यांनी बोलणे थांबविले. बोलणे थांबवल्यानंतर आता विद्यार्थ्यांना आपापले अनुभव व्यक्त करायला संधी दिली त्यातील काही विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. अनुभवामध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांना विचारलेले प्रश्न काय होते कोणत्या विषयावर चर्चा केली याबाबत सर्वांसमोर आपले अनुभव शेअर केले.
त्यामध्ये तू आज सकाळी कोणती भाजी खाल्ली? तू उद्या शाळेत येणार आहेस का? आज शाळा सुटल्यानंतर आपण खेळायला जाऊ, तुला कोणता खेळाडू आवडतो? असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी एकमेकांना विचारून गप्पागोष्टी करण्याचा प्रयत्न केला.
आता नंदिनी चा अनुभव ऐकण्यासाठी मी उत्सुक होतो. खरे तर दिलेल्या पाच मिनिटांमध्ये मी नंदिनीचे निरीक्षण करतच होतो. नंदिनीची जी मैत्रीण आहे ती तिच्याशी काहीतरी खाना-खुणा करून बोलत होती. थोडाफार मला अंदाजे येत होता की ती काय बोलत असावी. परंतु सर्व मुलांचे अनुभव ऐकल्यानंतर मी आता नंदिनीच्या मैत्रिणीला विचारले की तू नंदनी सोबत काय बोलत होती? आम्हाला सांग तुझा अनुभव.
नंदिनीच्या मैत्रिणीने सांगायला सुरुवात केली की मी तिला विचारत होते की तू सकाळी जेवण केलेस का? नंदिनी ची मैत्रीण कल्पना तिच्याशी जेवणाची खून करून तिच्याशी बोलत होती आणि नंदिनी मान हलवून उत्तर देत होती हे निरीक्षण मी त्याचवेळी केले होते. त्यानंतर नंदिनीच्या मैत्रिणीने तिला अभ्यासाबद्दल विचारले त्यावेळी देखील तिने पेन आणि वही दाखवून काहीतरी लिहिण्याचा खून करून तिने तिला विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी देखील नंदिनीने मान हलवून हो असे उत्तर दिले.
थोडक्यात या ठिकाणी मला एक चांगली गोष्ट दिसून आली की, समावेशित शिक्षणामध्ये विद्यार्थी कोणत्याही प्रकारचा असो, उदा. या ठिकाणी कर्णबधिर विद्यार्थ्यांनी होती मात्र तिच्याशी कसं बोलावं हे सांगण्याची त्या ठिकाणी गरज भासली नाही, तर तिची मैत्रीण स्वतः तिच्याशी तिच्या परिस्थितीनुरूप तिला समजेल तशा पद्धतीने ती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या चेहऱ्याच्या हावभावावरून खुणांवरून ती अर्थ लावत होती.
खेळ अजून संपला नव्हता आता मुलांना पुढील सूचना देण्यात आल्या.
आता पुन्हा आपल्याला पाच मिनिटं बोलायचं आहे मात्र यावेळी आपल्याला तोंड न उघडता बोलायचं आहे. म्हणजे तुमचं तोंड पूर्ण बंद असायला हवं. विद्यार्थी आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले. मग त्यांना थोडासा क्यू दिला की ज्याप्रमाणे नंदिनीची मैत्रीण नंदिनी सोबत बोलत होती तशा पद्धतीने तुम्हाला एकमेकांसोबत बोलायचं आहे. आवाज न करता, कारण आपल्याला तोंडाने बोलायचं नाही, तर आपल्याला जमेल तसे खानाखुणा करून खुणा करून आपल्याला एकमेकांशी बोलायचे आहे.
यावेळी मात्र मुले एकमेकांकडे बघून हसायला लागेले, मात्र काही मुलांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचे बघून इतर मुलांनी देखील बोलायला सुरुवात केली.
तोंड उघडता बोलणे हा या दुसऱ्या स्टेप चा नियम होता. सुरुवातीला काही मुलांना लक्षात न आल्याने ते तोंडाने बोलू लागली त्यावेळी त्यांना पुन्हा नियम समजावून सांगण्यात आला आणि मुलांकडून खुणांद्वारे बोलण्यास प्रोत्साहन दिले.
मुले एकमेकांसोबत खुणांद्वारे हातवारे करून चेहऱ्यावरचे हावभाव बदलून एकमेकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागले.
पाच मिनिटे संपल्यानंतर आता पुन्हा पहिल्यासारखे प्रत्येकाचे अनुभव व्यक्त करण्याची मुलांना संधी देण्यात आली.
यावेळी देखील मुलांनी एकमेकांना काय प्रश्न विचारले त्याबद्दलची माहिती दिली. त्यामध्ये जेवण करणे, लिहिणे, अभ्यास करणे, शाळेत येणे, खेळायला जाणे, पाऊस, अशा सोप्या सोप्या प्रश्नांबद्दल आपले अनुभव व्यक्त केले.
शेवटी मुलांना विचारण्यात आले की, आपल्याला जर बोलता आले नसते किंवा ऐकायला आले नसते तर आपण कसं बोललो असतो?
मुलांना याची जाणीव झाली की, आपल्या वर्गामध्ये नंदिनी आहे. काही मुले नंदिनीकडे बघू लागले. आणि खऱ्या अर्थाने आता मुलांना जाणीव झाली. नंदिनीला ही समस्या आहे. की ती ऐकू शकत नाही आणि बोलू शकत नाही.
अशावेळी आपण तिच्याशी अशा पद्धतीने बोलायला हवं. तिला समजून घ्यायला हव. तिला मदत करायला हवी. तिला आपल्या सोबत शाळेतील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्या सोबत सहभागी करून घ्यायला हवे.
हा खेळ खेळताना मुलांना खूप आनंद झाला होता. इयत्ता दुसरी तिसरीची काही मुले तर सर आम्हाला अजून अशा पद्धतीने बोलायचे आहे. सर मी हे विचारू का? हे बोलू का? अशा अनेक प्रकारचे प्रश्न विचारू लागले आणि त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव एक्सप्रेशन हे अत्यंत आनंद देणारे होते.
हाच खेळ आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. पुढच्या टप्प्यामध्ये आपण आता मुलांना तोंडाने न बोलता खुणा करून न बोलता, वही आणि पेन घेऊन कागदावर लिहून बोलण्याची संधी पुढच्या पाच मिनिटांमध्ये द्यायला हवी. जेणेकरून मुले आवडीने लिहायला लागतील यामध्ये लेखनाचा सराव होईल लेखन कौशल्य विकसित होण्यात मदत होईल. अजून बरच काही..
सारांश
जागतिक कर्णबधिर सप्ताह निमित्त मुलांना काय मार्गदर्शन करावे हाच मला पडलेला प्रश्न होता. शिक्षकांना पालकांना इतर मोठ्या व्यक्तींना तर आपण खूप मोठे लेक्चर देऊ शकतो. खूप सारी माहिती त्यांना सांगू शकतो पण मुलांना काय देणार, मुलांना काय सांगणार? तर त्यासाठी हा एक खेळ घेण्यात आला होता आणि या खेळाचा मुख्य उद्देश हाच होता की, नंदिनीच्या संदर्भात मुलांना जाणीव निर्माण करून देणे आणि तिच्याबद्दल मुलांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होऊन तिला अभ्यासामध्ये किंवा शाळेतील इतर उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी मुले मदत करतील जेणेकरून नंदिनीचा सर्वसामान्य शाळेत समावेशित शिक्षणामध्ये नंदिनी आनंदाने शिक्षण घेऊ शकेल आणि मुले देखील तिच्याकडे कर्णबधिर या नजरेने बघता तिला लागणारी मदत समजून घेतील.
यानिमित्ताने समाविष्ट शिक्षणामध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी अशा विविध खेळांच्या माध्यमातून आपण मुलांना त्यांच्याविषयीची जाणीव निर्माण करून देऊ शकतो आणि त्यांना लागणारी जी मदत आहे ती मिळवून देऊ शकतो. की जेणेकरून अशा मुलांची शिक्षण हे सहज आणि सोपं होईल. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक मूल आपल्या समवयस्क मुलांच्याच बरोबरीने घराजवळच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकेल.
हे सुद्धा वाचा
>> कर्णबधीर व्यक्तीचे प्रमाणपत्र कसे काढावे? | UDID Card Hearing Impairment
>> समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीर मुलांचे शिक्षण
>> दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार कर्णबधीर व्यक्तीची व्याख्या (दिव्यांग २१ प्रकार)
>> अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
>> स्वावलंबन कार्डचे (UDID) फायदे