नमस्कार मित्रांनो तंत्र अभ्यासाचे , रहस्य यशाचे या लेखामालेत मागील ब्लॉग मध्ये आपण वेळेचे नियोजन , दैनिक अभ्यासाचे नियोजन व स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र समजून घेतले. आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत. फ्लॅश नोटस् काढण्याचे तंत्र , परीक्षेत पहिले येण्याचे तंत्र याविषयी माहिती घेणार आहोत.
परीक्षेत पहिले येण्याचे तंत्र - फ्लॅश नोटस् (Notes) काढण्याचे तंत्र
भाग ४
परीक्षा कोणतीही असो , वाचन , लेखन , मनन , चिंतन त्याचबरोबर नोटस काढणे या सर्व बाबी अभ्यास करत असताना आपल्याला कराव्या लागतात. तर अभ्यासाचे फ्लॅश नोटस् काढण्याचे तंत्र आपण समजून घेवूया.
फ्लॅश नोटस् म्हणजे काय ? 📝
फ्लॅश नोटस् म्हणजे पाठय पुस्तकातील एक किंवा सर्व पाठयघटक संक्षिप्त स्वरूपात किंवा कोडींग करुन छोटयाशा कागदावर मांडली जाते त्यास फ्लॅश नोटस् असे म्हणतात .
शाळेत किंवा महाविद्यालयात शिकत असताना उद्या शिकवणारा भाग आदल्या दिवशी वाचून जावे. प्रत्येक तासाला जे शिकवले जायचे त्याचे एकाग्र चित्ताने श्रवण करावे. घरी आल्यावर ए फोर साईझच्या कागदाला ३ घड्या घालून एका बाजूला स्टेपल करुन ३ बाजू कट केल्यावर पाटकोरी १६ पानांची छोटी वही तयार होते. त्या वहीवर श्रवण केलेले सर्व मुद्दे कोडींग करून लिहावे.
उदाहरणार्थ भारताची प्राकृतिक रचना - हा घटक असला तर मुख्य मुद्यातील पहिले अक्षर घेवून एक संकेतशब्द जसे - स्था= स्थान , ह= हवामान , ता= तापमान , प=पर्जन्यमान , प्रा= प्राकृतिक रचना , प= पर्वत , प=पठारे , म= मैदाने ,न= नद्या , पि= पिके , उ= उद्योगधंदे आता हे सगळे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी त्याचा एक अर्थपूर्ण अथवा अर्थहिन संकेतशब्द तयार करायचा जो आपल्या सहज लक्षात राहील.
जसे - _स्थाहतापप्रापपमनपिउ एवढा ११ अक्षरी शब्द त्या छोटया वहीत लिहिला की जन्मभर हा घटक स्मरणात राहिला म्हणून समजा. एका शब्दात एक घटक म्हणजे दोन पानावर सगळा विषय बसायचा. सर्व विषय छोटया वहीत लिहून ठेवायच्यात . त्यामुळे भाराभर पुस्तके , नोटस् , गाईड , संदर्भ पुस्तके सोबत न्यायची गरजच भासणार नाही. सगळे विषय खिशात घेऊन. मग त्या नोटसना फ्लॅश नोटस असे नाव दिले कारण नोटस् हातात घेवून नुसती नजर फिरविल्यावर वर्षभरात सर्व विषयांचा जो अभ्यास झाला त्याचा एकत्रित फ्लॅश मेंदूत पडायचा आणि वर्गातील सर्व व्याख्याने , चर्चा , वाचन , लेखन क्षणात आठवायचं. म्हणून त्यांना फ्लॅश नोटस् असे नाव दिले .
आपल्या पद्धतीने आपण यामध्ये कल्पकता वापरून नोट्स बनवू शकता.
या तंत्राचा वापर असा करावा.
☄ तुमच्या गरजेनुसार अथवा मर्जीनुसार एका विषयाला एक किंवा सर्व विषयांना एक अशी वर सांगितले प्रमाणे छोटी वही तयार करा.
☄ खरं तर हे काम शाळा सुरू झालेल्या दिवसापासूनच करायचे असते पण हरकत नाही आता जसे वाचत जाल तसे घटकनिहाय मुद्यांचे अर्थपूर्ण अथवा अर्थहिन शब्द तयार करा ते वहीत नोट करून ठेवा.
☄ परीक्षेला जाण्यापूर्वी १ दिवस आगोदर विषय निहाय नोटस् नुसत्या नजरेखालून घाला. तुम्हाला सगळे आठवायला लागेल.
☄ परीक्षेला जाण्यापूर्वी याच नोटस् वरून नजर फिरवा. सगळा विषय मेंदूत जावून फ्लॅश होतो. त्यामुळे परीक्षेच्या आगोदर किमान १६ तास पुस्तक , गाईड किंवा इतर काहीच वाचू नका . फक्त फ्लॅश नोटस् च वाचा . प्रश्न कसाही आला तरी उतर मेंदूत तयार होते .
☄ गणितातील समिकरणे , विज्ञानातील सुत्रे , भाषेतील संदर्भ असो अथवा व्याकरण असो तुम्ही
फ्लॅश नोटस् काढण्यात पटाईत झाला की आपोआपच सगळे स्मरणात राहू लागते . पण त्यासाठी एकाग्रता आणि चिकाटी लागते. मग काय परीक्षेत पाहिले यायला खूप सोपे आहे.
परीक्षेत पहिलेच येण्याचे तंत्र
तसं पाहिलं तर कोणत्याही परीक्षेत पहिलं येणं खूप सोपं आहे, पण हे कधी शक्य आहे जेव्हा आपण स्वतः म्हणू तेव्हा. पाल्य तर कधी म्हणत नाही पण आपले पालक मात्र सतत म्हणत असतात तू पहिलाच आला पाहिजेस. कसं शक्य आहे सांगा हे ?
घोडयाला तलावापर्यंत घेवून जाण्याचे काम मालक करेल पण पाणी प्यायचं की नाही ते मात्र घोडाच ठरवेल. अशीच काहीशी गत पाल्याची झाली आहे. मुलांनो , तुम्हाला खरंच वाटतं का या परीक्षेत पहिलाच यावा ? जर आतून वाटत असेल तर १०० % शक्य आहे.
कारण स्पर्धेच्या शिडीवर वरच्या पायरीवर फक्त एकटाच असतो. बाकीचे सगळे अधे- मधेच असतात. जर तुम्हाला वरच्याच पायरीवर जायचे असेल तर हे तंत्र अवगत करा.
🎖 ज्या वर्गात तुम्ही प्रवेश घेतला आहे त्याच्या पहिल्याच दिवशी वर्गात पाऊल ठेवतानाच मनात ठाम ठरवा या वर्गातून मी पुढच्या वर्गात पाहिल्या नंबरनेच जाईन.
🎖 त्या दिवसापासून वर्गात जे जे शिकवलं जातं ते ते श्रवण करून फ्लॅश नोटस् काढायाला शिका .
🎖 दररोज जूनला २ तास , जुलैला ३ तास , ऑगष्टला ४ तास , सप्टेंबरला ५ तास , ऑक्टोंबरला ६ तास , नोव्हेंबरला ५ तास , डिसेंबरला ५ तास ,जानेवारीला ४ तास , फेब्रुवारीला ३ तास , मार्चला परीक्षेच्या आगोदर फक्त १ तास अभ्यास करायचा . या पध्दतीला मी सुलटी घंटा अभ्यास पध्दती असे नाव दिले .
( तास )
|
| | | |
| | | | | |
| | | | | | | |
| | | | | | | | |
| | | | | | | | | |
J J A S O N D J F M
➖ महिने➖
( सुलटी घंटा अभ्यास पध्दती )
🎖 आपण सर्वजण परीक्षेच्या आगोदर रात्रंदिवस अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेत आजारी पडतो. असं होऊ नये म्हणून सुलटी घंटा अभ्यास पध्दतीचा वापर करा आणि बघा कसे पाहिले येता ते..
🎖 अभ्यासात सातत्य ठेवून मनन , चिंतन करायची सवय लावायची.
🎖 दैनिक , साप्ताहिक व मासिक वेळापत्रक तयार करून वर दिले प्रमाणे दररोज अभ्यास त्या त्या महिन्यात तितके तास एकाग्र चित्ताने करायचाच .
🎖 दररोज पहाटे उठल्यावर थोडा व्यायाम करून स्वतःला स्वसंमोहित करून सूचना द्यायची की मी पाहिलाच येणार आहे , माझी स्मरणशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे .मी केलेला अभ्यास माझ्या स्मरणात राहिला आहे .
🎖 जिथे तुम्ही अभ्यास करता तेथे तुमच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी ठळक अक्षरात लिहून ठेवा. मला परीक्षेत पहिलाच यायचे आहे.
🎖 स्वतःच्या मनाची जबरदस्त तयारी करा. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे वारंवार मनाला बजावून ठेवा. तरच मनाची चंचल वृती थांबेल. मन स्थिर राहील.
🎖 रोज रात्री झोपण्यापूर्वी शवासनात पडून रहा , डोळे मिटा , दिर्घ श्वास घ्या आणि दिवसभर केलेला अभ्यास , लेखन मनचक्षू समोर आणा . मनातल्या मनात रिव्हिजन करा आणि शांत झोपी जा.
कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय हे तंत्र मी अवगत केल्याने प्रत्येक परिक्षेत यशस्वी झालो .तुम्ही प्रयत्न करून पहा. परीक्षेत पहिले येता का नाही !
सध्या परीक्षेचे दिवस आहेत. या काळात स्वतःला सकारात्मक सूचना देवून नियमितपणे अभ्यास करा. स्वतःवर विश्वास ठेवा , आपण पहिलेच येणार..
सर्वाना शुभेछ्या!